नेदरलँड्सचा तरुण योगी | The Young Yogi from The Netherlands

मूळचे नेदरलँडसचे असलेले स्वामी पूर्णचैतन्य यांचे सारे जीवन आणि शिकवण - सारे काही योगमय आहे. ते तिबेटीयन आणि संस्कृत भाषेचे पदवीधर असून, पत्रकारिता आणि नव प्रसारमाध्यमे याची देखील त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षक म्हणून त्यांनी भारत,  नेदरलँड,  दुबई,  भूतान आणि श्रीलंका आदी देशातील विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीच्या लोकांना योग, प्राणायाम आणि ध्यान शिकवत आहे. आज स्वामी पूर्णचैतन्य एक योग प्रशिक्षक म्हणून आपले अनुभव सांगत आहेत, तसेच योगाच्या साह्याने व योगाच्या माध्यमातून युवकवर्ग आपले जीवन अधिक समृद्ध आणि कौशल्यपूर्ण कसे करू शकतो याबाध्दल आपले मत व्यक्त करीत आहेत.

तुमच्या मते योग म्हणजे काय |What is yoga according to you?

योग हा परिपूर्ण आणि सर्वांगीण विज्ञान असून त्याद्वारे शरीर तंदुरुस्त कसे राखावे, मन व भावनांवर कसा ताबा मिळवावा, तणावयुक्त परिस्थिती कशी हाताळावी, साऱ्या कार्यकलापात आपला समतोल कसा टिकवावा याबध्दल शिकवण मिळते. आपला मूळ स्वभाव जो शाश्वत शांती, आनंद आणि  स्वतःसाठी तसेच समस्त जगतासाठी प्रेमाने ओथंबलेला आहे  याची अनुभूती मिळते. योगाद्वारे आपल्या मूळ नैसर्गिक स्वरूपाकडे आपण परततो.. योग म्हणजे केवळ झुकून पायाच्या बोटांना स्पर्श करणे नव्हे तर योग म्हणजे आपण जसे आहोत तसे परिपूर्ण आहोत, जिथे जाऊ तिथे अगदी घरच्या सारखे जाणवणे  आणि केवळ दुसऱ्यांच्या मागोमाग न जाता जीवन हि प्रसन्नतेची अभिव्यक्ती आहे या साऱ्या गोष्टींचा अनुभव घेणे होय.

योगशिक्षक होण्यास तुम्हाला कोणी प्रेरित केले? किती वर्षांपासून तुम्ही योग शिकवीत आहात |What – or who - inspired you to become a teacher of Yoga? How long have you taught Yoga?

माझे मुख्य प्रेरणास्थान गुरुदेव श्री श्री रविशंकर आहेत  ज्यांना मी सोळा वर्षाचा असताना नेदरलँडमध्ये भेटलो होतो. योग प्रक्रिया आणि ज्ञानाचे बरेच लाभ अनुभवल्यानंतर तसेच इतरांच्या जीवनातही योगामुळे परिवर्तन घडतांना पाहिल्यानंतर मी हे ज्ञान जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले. मी गेल्या दहा वर्षांपासून योग आणि योग प्रक्रिया शिकवीत आलो आहे.

स्वामी पूर्णचैतन्य विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना...

युवकांसाठी योग कश्या प्रकारे फायदेशीर आहे |How can yoga help youth?

युवकांना योगामुळे आपल्या मन व भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत लाभते. तसेच-

  • आयुष्याबद्दल, जगाबद्दल आणि भोवतालच्या लोकांबद्दल विशाल दृष्टिकोन लाभतो.
  • तंदुरुस्त शरीर आणि शांत मन लाभते.
  • एकाग्रता वाढते, स्मृती तीक्ष्ण होते, नकारात्मक भावनांना हाताळण्याचे कसब वाढते.
  • आपल्याला कसे वाटते आणि जगाला आपण कसे बघतो याच्या नियंत्रणास बळ लाभते.

योग शिकवणे म्हणजे आपल्या दृष्टीने काय आहे |What does teaching yoga mean to you?

समाजासाठी म्हणाल तर, आपल्याला जे काही लाभले ते परत देणे आणि हे जग अजून शांत, सुखी आणि निरोगी करण्यास आपले योगदान देणे  हेच आहे योग. व्यक्तिगत पातळीवर म्हणाल तर, प्रत्येकाने आपापली जबाबदारी उचलण्यास त्यांना सक्षम करणे, त्यांना आपले शरीर निरोगी, मन शांत आणि दृष्टिकोन सर्वव्यापी ठेवण्याची कला शिकविणे हेच आहे योग. माझ्या स्वतःसाठी म्हणाल तर गुरुदेवांच्या दृष्टिकोनातुन हे जग जसे हिंसामुक्त, तणावमुक्त हवे तसे बनविण्यासाठी आपले योगदान देणे आणि रोजच्या जगण्यासाठी या योग प्रक्रियांचा आणि अमूल्य ज्ञानाचा पुरेपूर वापर करणे  हे आहे योग.

स्वामी पुर्णचैतन्य जेलमधील कैद्यांसाठी शिबीर घेताना...

योग शिकविताना तुमचा स्वतःचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला |How has teaching Yoga changed your perspective, your worldview? 

कोणतीही व्यक्ती मग तिचा भूतकाळ कसाही का असो ती एका बालकाप्रमाणेच निष्पाप आणि निरागस असते. या दृष्टीनेच बघण्याचा दृष्टीकोन मला लाभत गेला. दोषी गुन्हेगार असोत, व्यसनाधीन, मोठे उद्योजक किंवा युवक असोत, त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल होऊन नंतर त्यांना समाजाची काळजी घेत, शांती आणि समृद्धी पसरविताना, आपल्या लोकांचे उत्थान करताना आणि मदत करताना मी पाहिले आहे.

काही लोक योग म्हणजे व्यायामाचा एक प्रकार या दृष्टीने पहातात. याबाबत आपले काय मत आहे |Some people look at yoga as a means to exercise. What is your view on this?

प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे योग अर्थ म्हणजे व्यक्तीगत चेतनेचे सामायिक, वैश्विक चेतनेत एकरूप होणे आणि ते साध्य करण्यासाठीचा मार्ग अवलंबणे म्हणजे ‘योग’ होय. काही व्यायाम प्रकारामध्ये शरीर लवचिक करणे, स्नायू मजबूत करणे आणि काही कॅलरीज जाळणे यासाठी काही व्यायाम करवितात, पण त्याला योग म्हणणे ही चुकीची कल्पना आहे. एखादे आसन बरोबर करताना, भलेही तुमच्या पायाच्या बोटांना स्पर्श होऊ शकत नसेल, पण तुम्ही योगाची स्थिती प्राप्त करू शकता. त्याच वेळी कुणी कठीण आसन करूनही क्षुब्ध, निराश किंवा विचलित राहू शकतो.

नव्या, भावी योग प्रशिक्षकांसाठी काही सूचना |Any tips for new or prospective Yoga teachers?

कधीही योगसराव आणि शिकणे सोडू नका. विद्यार्थी असणे कधीही थांबवू नका. हे ज्ञान अथांग आहे आणि ज्या क्षणी आपण विचार करतो की हे आपल्याला माहीत आहे, त्याच क्षणी आपले शिकणे थांबते.