योगाच्या नवशिक्यांकडून होणाऱ्या ५ हमखास चुका (5 Common mistakes in Yoga Marathi)

योग सराव करणे ही केवळ तुमच्या भौतिक शरीराकरिताच नव्हे तर मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण चैतन्याकरिता फारच उत्कृष्ठ युक्ती आहे यात काहीच शंका नाही.

तरीसुद्धा एक नवशिके म्हणून या प्राचीन आणि सध्या फँशनमध्ये असलेल्या पद्धतीचा सराव करताना काही मुख्य चुका घडतात. लवचिकता, मजबूतपणा आणि सरतेशेवटी “योगस्थिती” कमावण्याची गुरुकिल्ली आहे सुसंगतता, सराव आणि चिकाटी.

नवशिक्यांकडून घडणाऱ्या काही हमखास चुका खालीलप्रमाणे:

१. बाजूच्या सतरंजीवरील व्यक्तीबरोबर स्वतःची तुलना करणे

स्वतःला इजा करून घेण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे योगवर्गामध्ये बाजूच्या सतरंजीवरील व्यक्ती काय करते आहे ते पाहणे आणि तिच्या इतके शरीर ताणायचा किंवा वर उचलायचा प्रयत्न करणे होय. आनुवंशिकता, वयोमान, भूतकाळातील दुखापती, आपला आहार आणि अशाप्रकारच्या अनेक कारणांमुळे आपल्या शरीराचा प्रकार आणि ठेवण ही वेगवेगळी असते. बाजूच्या सतरंजीवरील व्यक्ती ही पूर्वी कुशल नर्तक असेल, वर्षानुवर्षे योगाचा सराव करीत असेल किंवा तिचे शरीर जन्मतःच लवचिक असेल. आपल्या स्वतःचा अनुभव आणि आपले स्वतःचे शरीर यावर लक्ष केंद्रित न करता जर आपण तुलना करू लागलो आणि शरीर तयार नसतानासुद्धा त्याच्या कुवतीच्या पलीकडे त्यावर ताण देऊ लागलो तर आपण निःसंशयपणे मोठी चूक करतो आहे.

२. वीस वर्षापूर्वी, चार वर्षापूर्वी किंवा अगदी आधीच्या वर्गात आपले शरीर कसे होते त्याच्याबरोबर तुलना करणे

तुम्ही सहा वर्षाचे होतात ते आठवते का? तुम्ही गवतावर कोलांट्या उड्या मारायचात, किंवा संपूर्ण पद्मासनात एक तास बसायचात! होय, पण तेव्हा तुम्ही एक बालक होतात, तुमच्या शरीराला तणाव आणि नकारात्मक भावनांचा सामना करावा लागला नव्हता. तुम्ही तासनतास टेबलावर बसून काम करण्याच्या आधी किंवा तुमचे बाळंतपण होण्याच्या आधीचा तो काळ होता. कदाचित काही आसने तुम्ही गेल्या आठवड्यात करू शकत होतात पण आता आज करू शकत नाही आहात. इथे मुख्य मुद्दा आहे तो हा की गतकाळातील शरीराचे सामर्थ्य आणि लवचिकता याबरोबर आज स्वतःची तुलना करू नका. “ आजच्या या क्षणाला मी हा श्वास आणि या शरीरासोबत इथे आहे” असे स्वतःला सांगा.

३. जागरुकतेशिवाय आपल्या शरीरावर अधिक ताण देणे

एक सामान्य चूक नवशिके हमखास करतात आणि ती म्हणजे, “मी अनेक वर्षे व्यायाम/ एरोबिक/ टेनिस खेळणे/ घोडेस्वारी करणे (किंवा इतर कोणत्या प्रकारचा शारीरिक व्यायाम) करीत आहे. माझ्यासाठी योग करणे एकदम सोपे आहे”, असा विचार करणे होय. काही योगासने जरी वरवर पाहता सोपी वाटत असली तरीही ती स्नायूंच्या गहन उतींवर कार्य करतात आणि त्यांचा सराव जागरूकतेने आणि काळजीपूर्वक करायचा असतो. जे नवीन लोक असतात त्यांना सुरुवातीपासूनच गर्वाने प्रेरित होऊन आणि आपण फिट आहोत हे शाबित करण्यासाठी स्वतःला क्षमतेपलीकडे ढकलायचे असते. दुर्दैवाने याचा परिणाम दुसऱ्या दिवशी अंग दुखी होते. आणि अजून वाईट म्हणजे शरीर तयार नसताना त्याच्या क्षमतेच्या पलीकडे ढकलल्यामुळे शरीराला इजा होणे. म्हणूनच शिक्षकांच्या सूचना नीट ऐका आणि  तुमच्या शरीराचेसुद्धा ऐका आणि स्वतःवर बळजबरी करू नका.

४. तुमच्या सरावात विसंगती असणे

बहुधा योगवर्गानंतर आपल्याला इतके मोकळे आणि आरामकारक वाटते की आपण आपल्या मित्रपरिवाराला सांगण्यापासून आणि पुढच्या दिवशी योगवर्गाला हजेरी लावण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही. पण अखेरीस आणि अपरिहार्यपणे दैनंदिन कामे कमरेवर हात ठेऊन समोर उभी ठाकतात आणि व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जीवन आणि कामांसाठी मारलेल्या खेपा याने आपले लक्ष विचलित होते आणि मग कामांच्या यादीत योगाचा सराव हा शेवटच्या क्रमांकावर जाऊन बसतो. थोडे दिवस जातात आणि मग काही आठवडे उलटतात आणि शेवटी जेव्हा आपण योगवर्गात पोचतो तेव्हा आपले ‘येरे माझ्या मागल्या’ झालेले असते. नियमित आणि सातत्यपूर्ण सराव--सुरुवातीला आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा करणे आदर्श असल्यामुळे शरीर हळूहळू मोकळे होऊ लागते आणि आसने करण्यात प्रगती होऊ लागते.

५.आपल्या शरीराबद्दल संयम गमावणे, कष्टी होणे आणि शेवटी हार मानून योग करणे सोडून देणे

बराच काळ—कदाचित काही आठवडे, काही महिने किंवा काही वर्षे--योगाचा सराव केल्यानंतर आपल्याला वैफल्य येऊ लागते. “माझे शरीर काही आसने का करू शकत नाही” आणि “मी माझ्या पायाचे अंगठे का धरू शकत नाही?” यासारखे प्रश्न मनात घर करू लागतात. शेवटी आपण संशयाचे सावज होतो आणि “कदाचित योग माझ्यासाठी नाहीच आहे” असा विचार मनात घोळू लागतो.  परंतू योगाचे सौंदर्य आणि डौल फारच तरल आहे आणि ते अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करते. जेव्हा जेव्हा योगाच्या परिणामकारकतेवर शंका यायला लागेल तेव्हा तेव्हा स्वतःला विचारा की आधीपेक्षा आताच्या तुमच्या मनःस्थितीत काय बदल आहे? जेव्हा कधी तणावयुक्त परिस्थिती उद्भवते तेव्हा तुम्ही मनाने अधिक ‘लवचिक’ आहात, नाही का? योगाने तुम्हाला कसा संपूर्ण आराम दिला आहे आणि श्वसन चांगले केले आहे आणि तुम्हाला तुमचे शरीर आणि त्याच्या कार्याबाबत कसे अधिक जागरूक बनवले आहे याचा विचार करा.

 

या मुद्द्यांपैकी एकही मुद्दा तुम्हाला तुमच्याशी संबंधित वाटत असेल तर तुम्हाला कळले असेलच की तुमची चूक कोठे होते आहे ते. तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही योग करायला सतरंजी अंथराल तेव्हा या चुका करणे टाळा आणि तुमच्या सरावातील निराळेपणाचे निरीक्षण करा!

 

हा लेख मीना इर्सेल यांनी लिहिला आहे.

 

मीना यांच्याविषयी: १९९९ मध्ये मीना आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रात असताना सर्वप्रथम योगाचे बी त्यांच्यामध्ये पेरले गेले. त्यांचा शोध त्यांना भारतात घेऊन आला जिथे त्यांनी अध्यात्माचा खरा अर्थ त्यांचे शिक्षक आणि दि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांच्याबरोबर नव्याने शोधून काढला. २००१ पासून त्या योगाचा सराव करीत आहेत आणि त्याच्या तत्वज्ञानाचा समावेश स्वतःच्या दैनंदिन जीवनात करीत आहेत.

२०१० मध्ये टीचर ट्रेनिंग प्रोग्रॅम पूर्ण झाल्यावर मीना या तुर्कस्तान आणि परदेशात सक्रियपणे शिकवण्याचे काम करीत आहेत. योगाव्यतिरिक्त त्या आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात, आंतरराष्ट्रीय न्यूयॉर्क टाईम्सच्या तुर्कस्तानच्या प्रतिकरिता आठवड्यातून एकदा लेखन करतात आणि त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपीनेस प्रोग्रॅमच्या शिक्षिका आहेत.

नियमित सरावाने शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि सोबत आरोग्याचा लाभ होतो पण हे औषधाला पर्यायी नाही.  श्री श्री योग  प्रशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योग शिकणे व त्याचा सराव करणे हे अतिशय महत्वाचे आहे. वैद्यकीय समस्या असल्यास, योगाचा सराव करायच्या आधी डॉक्टर आणि श्री श्री योग शिक्षक यांचा  सल्ला घ्यावा. तुमच्या जवळील आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर मध्ये श्री श्री योग शिबिराचा शोध घ्या. तुम्हाला शिबिरांसंदर्भात माहिती हवी आहे का किंवा तुम्हाला तुमची प्रतिक्रिया नोंदवायची आहे का? आम्हाला info@srisriyoga.in इथे लिहा

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf