चक्र योगाने शरीराचा समतोल साधा!

7 chakras balancing

 

आपल्या शरीरात ७ चक्रे किंवा शक्तीस्थाने आहेत, ज्यातून प्राणशक्ती फिरत असते. या चक्रात अडकलेली शक्ती आजारांचे कारण ठरू शकते. म्हणूनच प्रत्येक चक्राचा अर्थ समजून घेणे आणि शक्ती फिरत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जेंव्हा चक्र किंवा शक्तीचे चाक अवरोधित असते, तेंव्हा प्राणशक्ती मोकळी करण्यासाठी विशिष्ठ हालचालींची मदत होऊ शकते. शरीरात अडकलेली शक्ती मोकळी करण्याचा योगासने हा उत्तम मार्ग आहे, कारण या आसनांमुळे व श्वासामुळे नविन शक्ती आकर्षित केली जाते. 

योग हा शारिरीक आणि अध्यात्मिक सराव असल्यामुळे योगासने हा फक्त शरीरासाठीच नाही तर, मन, भावना आणि आत्म्यासाठीपण आहे, म्हणूनच चक्रांच्या समतोलासाठी हा सर्वोत्तम व्यायाम ठरतो.

 

१. मूलाधार चक्र

तत्व: पृथ्वी‌‌; रंग:लाल; मंत्र: लं.

स्थान: मज्जारज्जूच्या तळाशी,गुद्द्वार व जननेंद्रियांच्या मधे

मूलाधार चक्राचा प्रभाव अधिवृक्क ग्रंथी, मूत्रपिंड, पचनसंस्थेचा खालचा भाग, उत्सर्जन क्रिया आणि लैंगिक क्रिया यांवर असतो. या चक्रातील दोषामुळे थकवा, शांत झोप न लागणे, कंबरदुखी, मांड्या व पाय दुखणे, बद्धकोष्ठ, नैराश्य, रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम, स्थूलपणा व खाण्याच्या चुकीच्या सवयी दिसून येतात.

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

अस्थिरता, भीती, राग, स्वत:वर अविश्वास, असुरक्षितता, आरामाची आवश्यकता आणि सतत मालकी हक्क दाखवणे

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

स्थिरता आणि एककेंद्रीत वाटणे, वचनबद्ध आणि स्वतंत्र, ,उर्जा आणि चेतना असणे, ताकद आणि शांतता, उत्तम पचनशक्ती

चक्र संतुलित करण्यासाठी आसने

पायावर वजन टाकणारी आसने जसे की, पर्वतासन, कोनासन, वीरभद्रासन, उत्तानासन आणि सेतू बंध सर्वांगासन

 

२. स्वाधिष्ठान चक्र

तत्व : पाणी; रंग: नारंगी; मंत्र : वम्

स्थान: माकडहाडाच्या खाली, जननेंद्रियांच्या आणि मज्जारज्जूच्या मधे

स्वाधिष्ठान चक्राचा संबंध व्यक्तीची मानसिकता, निर्मितीक्षमता, इच्छा, आनंद व स्व-समाधान, उत्पत्ती आणि वैयक्तिक संबंध यांच्याशी आहे. लैंगिक अवयव, पोट, आतड्यांचा वरचा भाग, यकृत, पित्ताशय, मूत्रपिंड, स्वादुपिंड, ऍड्रीनल ग्रंथी, प्लीहा, पाठीच्या कण्याचा मधला भाग आणि रोगप्रतिकारशक्ती यांच्यावर या चक्राचा प्रभाव असतो. या चक्राच्या असंतुलनामुळे पाठीचा खालचा भाग दुखणे, कंबरदुखी, कामवासना कमी होणे, ओटीपोटात दुखणे, मूत्रमार्गासंबंधी त्रास, अन्नपचन मंदावणे, संसर्गजन्य आजार व विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती कमी होणे, थकवा, संप्रेरकांचे असंतुलन आणि पाळीसंबंधी त्रास होतात.

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

चिडचिड होणे, लाजाळूपणा, स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देणे, शरिरसुखाचे तीव्र आकर्षण, सर्जनशीलतेचा अभाव.

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

करुणा आणि मित्रत्वाची भावना, अंतर्बोध , जिवंतपणा, आपुलकीची भावना आणि विनोदबुद्धी

चक्र संतुलित ठेवणारी आसने

नितंबाला व्यायाम देणारी आसने, प्रसरित पादोत्तानासन, उपविष्ठ कोनासन आणि बद्ध कोनासन

 

३. मणिपूर चक्र

तत्व: अग्नि; रंग: पिवळा; मंत्र: रं

स्थान: नाभीच्या जवळ, जठर किंवा सोलर प्लेक्ससच्या जवळ

मणिपूर चक्राचा संबंध आपुलकी, भावनांची मानसिक समज आणि व्यक्तीचे स्वत:बद्दलचे मत ‌यांचाशी आहे. पोटाचा वरचा भाग, पित्ताशय, यकृत, पाठीच्या कण्याचा मधला भाग, मूत्रपिंड, अॅड्रीनल, छोटे आतडे आणि जठर या सर्वांच्या कामावर मणिपूर चक्राचा प्रभाव असतो. असंतुलित मणिपूर चक्रामुळे मधुमेह, पॅंक्रियायटीस, ऍड्रीनलमधे असमतोल, संधिवात, मोठ्या आतड्याचे आजार, पोटाचा अल्सर (क्षय), आतड्यांमधे गाठी, भूक मंदावणे किंवा रक्तदाब कमी होणे हे त्रास होऊ शकतात.

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

स्वाभिमान कमी होणे, बुजरेपणा, नैराश्य आणि नकाराची भीती, निर्णयक्षमता कमी होणे, पट्कन मत बनवणे, राग आणि वैर धरणे

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

उत्साही, आत्मविश्वासू, हुशार, एकाग्रचित्त, उत्तम पचनशक्ती

चक्र संतुलित ठेवणारी आसने

उष्णता वाढवणारी आसने, जसे की सूर्यनमस्कार आणि वीरभद्रासन; पाठीचे व्यायाम जसे की धनुरासन, शरीराला पीळ देणारी आसने जसे की अर्ध मत्स्येंद्रासन; आणि पोटाचे स्नायू बळकट करणारी आसने जसे की नौकासन.

 

४. अनाहत चक्र

तत्व: वायू; रंग: हिरवा किंवा गुलाबी; मंत्र: यं

स्थान: हृदयाच्या जवळ 

व्यक्तीच्या सामाजिक ओळखीवर अनाहत चक्राचा परिणाम होतो; आणि विश्वास, क्षमाशीलता, निरपेक्ष प्रेम, ज्ञान, दया आणि आत्म्याशी संबंधित मुद्दे यांवर प्रभाव पडतो. या चक्राचे कार्य हृदय, बरगड्या, रक्त, रक्ताभिसरण संस्था, फुप्फुसे आणि पोटातील पडदा, थायमस ग्रंथी, स्तन, अन्ननलिका, खांदे, दंड, हात यांचाशी संबंधित आहे. 

असमतोलामुळे, छातीजवळील पाठीचा कणा, पाठीची वरची बाजू आणि खांदे याचे त्रास, दमा, हृदयविकार, श्वास घ्यायला त्रास होणे आणि फुप्फुसांचे आजार होऊ शकतात.

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

प्रेमाचा अभाव, आशा, दया आणि आत्मविश्र्वासाचा अभाव, निराशावाद आणि लहरी स्वभाव.

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

परिपूर्ण आणि संपूर्णतेची भावना, दयाभाव, समभाव, मित्रत्व, आशावादी, उत्स्फुर्त आणि समाजात मिसळण्याची प्रवृत्ती

चक्र संतुलित ठेवणारी आसने

छातीचे व्यायाम उष्ट्रासन, भुजंगासन, मत्स्यासन, नाडीशोधन व भस्त्रिका प्राणायाम
 

५. विशुद्धी चक्र

तत्व: आकाश; रंग: निळा; मंत्र: हं

स्थान: घशाचा जवळ, घशाचा पोकळीमध्ये

विशुद्धी चक्राचा संबंध संवाद, सर्जनशीलता, विश्वास, खरेपणा, सजगता आणि अभिव्यक्ती या व्यक्तीमत्वाच्या पैलूंशी आहे. याचा प्रभाव गळा, गलग्रंथी आणि परावटू ग्रंथी, श्वासनलिका, मानेतील मणके, स्वरतंतू, 

मान व खांदे, दंड, हात, अन्ननलिका, तोंड, दात आणि हिरड्या यांवर असतो. असंतुलित विशुद्धी चक्रामुळे गलग्रंथीचे काम नीट न होणे, खोकला, मान आखडणे, तोंड येणे, हिरड्या  किंवा दाताचे त्रास, स्वरयंत्राचा दाह, ऐकण्याचा त्रास, इत्यादी त्रास होतात. 

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

अविश्वास, निर्णयक्षमता नसणे, कमकुवत इच्छाशक्ती, अभिव्यक्तीचा अभाव, सर्जनशीलतेची कमतरता आणि व्यसनांच्या आहारी जाण्याची वृत्ती.

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

सर्जनशीलता आणि बोलके व्यक्तिमत्व, उत्तम संवादकौशल्य, समाधानी, चांगला श्रोता.

चक्र संतुलित ठेवणारी आसने

मत्स्यासन, मार्जारासन, मानेचे व्यायाम आणि सर्वांगासन, सेतू बंध सर्वांगासन आणि हलासन

 

६. आज्ञा चक्र

तत्व: प्रकाश; रंग: नीळा; मंत्र: ॐ।

स्थान: भ्रूमध्य, (तिसऱ्या डोळ्याची जागा)

आज्ञा चक्राचा संबंध स्वत्वाची जाणीव, शहाणपणा, बुद्धी, दृष्टिआड असणार्‍या गोष्टी पाहण्याची दृष्टी, कल्पनांची अंमलबजावणी, अलिप्तता, अंतर्ज्ञान, समजूतदारपणा आणि अंत: प्रेरणेने तर्क करु शकणे यांच्याशी आहे. याचा प्रभाव मेंदू, डोळे, कान, नाक, पीयूष ग्रंथी(pituitary gland), शीर्षग्रंथी(pineal gland), आणि चेतासंस्था यांवर असतो. चक्राच्या असंतुलनामुळे डोकेदुखी, भीतीदायक स्वप्ने, डोळ्यांवर ताण, शिकण्याची क्षमता कमी असणे, खूप भीती वाटणे, नैराश्य, आंधळेपणा, बहिरेपणा, आकडी येणे किंवा मणक्यांशी संबंधित आजार हे त्रास होऊ शकतात.

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

चुकीची मते, गोंधळ, सत्याची भीती, बेशिस्त आणि एकाग्रता साधता न येणे.

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

सुस्पष्ट विचार, चांगली कल्पनाशक्ती, चांगली अंतर्ज्ञानशक्ती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यात सुधारणा

चक्र संतुलित ठेवणारी आसने

बालासन, ध्यान, योग मुद्रा; डोळे आणि डोळ्याभोवती हात फिरवणे. 

 

७. सहस्त्रार चक्र

तत्व: अंतश्चेतना; रंग: जांभळा किंवा पांढरा; मंत्र: मौन

स्थान: माथ्यावर

सहस्त्रार चक्राचा प्रभाव अंतर्ज्ञानाने माहिती होणे, अध्यात्माशी नाते, मन-शरीर-आत्मा आणि अंतश्चेतनेची सजगता (conscious awareness) यांचे एकीकरण यांवर असतो. डोक्यामधील केंद्र, कानांच्या वरील मध्यभागातून जाणारी रेषा, मेंदू, चेतासंस्था आणि शीर्षग्रंथी (pineal gland) या चक्राच्या अखत्यारीत येतात. या चक्राच्या असंतुलनामुळे अतिथकवा आणि उजेड व आवाजाबद्दल संवेदनशीलता येते.

असंतुलनाचा वर्तनावर होणारा परिणाम:

ध्येय नसणे, स्वतःवर शंका (identity crisis), कुठल्याही अध्यात्मिक पद्धतीवर किंवा श्रद्धेवर, स्फूर्तीस्थानाबद्दल  अविश्वास, भीतीची भावना आणि भौतिकवादी स्वभाव

चक्र संतुलित असल्याची लक्षणे

विश्वाशी एकरुप असल्याची जाणीव, खुले मन, हुशार,  व विवेकी, विचार व कल्पना ऐकून घेणारा, एकुणच सुुसंवादी व्यक्तीमत्व.

चक्र संतुलित ठेवणारी आसने

तोल सांभाळत करावयाची आसने ज्याने शरीराबद्दल सजगता वाढेल ; जसे कि योगमुद्रेत बसून ‌ध्यान करणे.