योगाद्वारे घोरणे शांत करा (Yoga for snoring in Marathi)

घोरणे म्हणजे श्वासोच्छवास करताना येणारा आवाज. याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचे दिसून आलें आहे. श्वासोच्छवासात काहीसा अडथळा निर्माण झाल्यामुळे घोरले जाते. मात्र कधी कधी याचे स्वरूप अधिक तीव्र आजाराचे असू शकते.

घोरणे ही अगदी सामान्य गोष्ट असली तरी त्याचा त्रास स्वत: घोरणाऱ्यालाच होतो असे नाही तर भोवतालच्या लोकांनाही होतो. “तुम्ही हसलात तर सगळे जग हसते पण तुम्ही घोरलात तर तुम्हाला एकट्याला झोपावे लागते.” यातील विनोदाचा भाग सोडला तरी भोवतालच्या लोकांची झोपमोड होऊन त्रास होतोच. जवळ जवळ अर्धी मोठी माणसे घोरतात आणि त्याचा त्रास होतो त्यामुळे याकडे लक्ष देणे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.

घोरणे कसे घडते :

जेव्हा तुम्हाला झोप लागते, तेव्हा आधी हलकी आणि मग गाढ झोप लागते आणि हळू हळू तोंडातील टाळू, घसा आणि जिभेचे स्नायू शिथिल होतात आणि घशातील श्वासन मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तेथील ऊती (टिश्यू) थरथरून कंप पावू लागतात आणि तो मार्ग जितका अरुंद तितका कंप पावण्याचा आवाज जास्त मोठा.

त्यामुळेच, जर तुम्ही अतिस्थूल असाल किंवा तुमची पडजीभ जर जास्त लांब असेल तर हवेचा मार्ग आणखीनच अरुंद होतो.

घोरण्यावर उपाय शोधण्यासाठी त्याचे कारण शोधायला हवे. एकदा घोरण्याचे कारण समजले की त्यावर उपाय करणे सोपे जाते.

घोरण्याची कारणे :

  • मानसिक ताण किंवा रक्ताभिसरणाची समस्या
  • सायनस किंवा नाकाशी संबंधित इतर त्रास
  • स्थूलता
  • धूम्रपान
  • झोपण्यापूर्वी केलेले मद्यपान
  • असंतुलित आहार
  • कुटुंबातील व्यक्तींचे घोरण्याचे प्रमाण
  • विशिष्ट औषधे
  • अॅलर्जी / वावडे असणे
  • मोठी जीभ किंवा टॉन्सिल्स किंवा नाकासंबंधी समस्या उदा. नाकातील फोड / माळीण, नाकाचा सरकलेला पडदा
  • वाढलेले वय ( स्नायू सैल पडणे, वजन वाढणे)

घोरण्याचे दुष्परिणाम:

घोरणे ही फक्त एक वाईट सवय आहे असे नाही. त्य्घोर्ण्याची कारणे समजून घेतल्यानंतर आता आपण हे बघू की त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा भोवतालच्या लोकांवर कसा परिणाम होतो आणि त्याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात?

  • झोपेचा अभाव आणि याचा परिणाम म्हणून हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
  • तुमच्या घोरण्याचा परिणाम होणाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या.
  • झोपेची गुंगी, वाढलेली चीडचीड, वैतागणे.
  • श्वासात अनियमितपणा किंवा श्वासमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे धाप लागणे, गुदमरणे.
  • घसा बसणे, काही वेळा छातीत दुखणे.
  • दूरगामी परिणामांची वाढती शक्यता – अर्धांगवायूचा झटका, हृदय विकार.
  • मशीनवर काम करणारे, वाहन चालवणारे यांना धोका, कारखान्यातील अपघातांची शक्यता.
  • एकाग्रता न होणे.
  • कामवासना कमी होणे.
  • लंडन मधील एका संशोधनात दिसून आले की सोबत झोपलेल्या व्यक्तीचा रक्तदाब वाढू शकतो.

शस्त्रक्रिया किंवा घोरणे थांबवण्यासाठी विशिष्ट उपकरणांचा वापर असे उपचाराचे अनेक मार्ग आहेत. पण योगाचा मार्ग सुरक्षित आणि इतर दुष्परिणाम नसलेला म्हणून सुचविला जातो.

घोरणे शांत करा :

योगाने घोरणे कमी होण्यास किंवा त्यावर नियंत्रण करण्यास मदत होऊ शकते आणि तुमच्या इतर उपचारांपेक्षा हे सुरक्षितपणे करू शकता. काही विशिष्ट योगासनांनी चोंदलेला श्वास्मार्ग मोकळा  होऊ शकतो.

करायला सोपे आणि रोज करायला मजा येणाऱ्या आसनांचा परिणाम बघून तुम्ही चकित व्हाल. नियमित सरावाने चांगला फायदा होऊ शकतो. शरीरयष्टी सुधारेल आणि लवचिकता येईल.

घोरण्याला रोखण्यासाठी खालील आसने नियमितपणे करा.

१. प्राणायाम : यामुळे घशातील आणि चेहऱ्याच्या स्नायुंना बळकटी येईल. भ्रामरी व उज्जयी प्राणायाम

२. सिंह गर्जना

३. ॐकार साधना

झोपेच्या सवयींना पूरक अशी जीवनशैली स्विकारणे.

आणखी काही पूरक गोष्टी म्हणजे वजन कमी करणे, मद्यपान आणि धूम्रपान वर्ज्य करणे, चोंदलेळे नाक व घसा यासाठीची औषधे दीर्घकाळ न घेणे. कुशीवर झोपाण्यानेही फायदा होऊ शकतो. आयुर्वेदानुसार योग्य तो आहार घेण्यानेही फायदा होतो.

आरोग्याच्या विविध अंगांवर, स्वास्थ्यावर, आणि स्वत:च्या आणि इतरांच्या रोजच्या दिनचर्येवर याचा परिणाम होत असल्याने यावर योग्यवेळी उपाय करणे इष्ट. योग आणि ध्यान यांची सुयोग्य शिस्त आणि झोपेच्या बाबतीतले आरोग्य सांभाळून स्वत:ला आणि भोवतालच्या माणसांना घोरण्याच्या त्रासापासून दूर ठेवा.

योगसाधनेमुळे शरीर आणि मन यांचा विकास होतो आणि त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण तरीही तो औषधास पर्याय नाही. प्रशिक्षित तज्ञ आणि प्रशिक्षित योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने शिकणे आणि  करणे महत्वाचे आहे. जर काही व्याधी असेल तर डॉक्टर आणि योग शिक्षक यांचा सल्ला घेतल्यानंतरच आसने करणे चांगले.