उत्कृष्ट पोहण्यासाठी सहाय्यक सात योगासने | 7 Yoga Asanas to Swim Better

पोहणे किंवा जलतरण हा कदाचित एकमेव व्यायाम प्रकार असेल जो कसलाही घाम न गाळता तुमच्या कॅलरीज खर्च करायला मदत करतो. ह्यात शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागांचा योग्य समन्वय साधत उपयोग केला जातो, तसेच तुमची श्वसन क्षमता ही उत्तम असावी लागते. तुम्ही मौजेखातर पोहत असाल किंवा निष्णात जलतरणपटू असाल, तरीही पोहताना एखाद्या वेळेस इजा होण्याचा संभव असतो. अशी इजा टाळणे पुर्णपणे अशक्य असले तरीही काही खबरदारी बाळगून त्याचा प्रभाव कमी करणे आपल्या हातात नक्कीच आहे.

एखादा स्नायू अचानक ओढला गेला किंवा त्यावर खूप ताण आल्यास इजा होण्याची शक्यता असते. दोन्ही बाबतीत, स्नायूंना शिथिल केल्यास इजेची संभावना कमी होऊ शकते. लवचिकतेच्या हालचाली, योगासने, प्राणायाम यामुळे दुखापतीची तीव्रता कमी होण्यास मदत होते. दोन हजार वर्षांपासून वापरात असलेल्या या प्राचीन तंत्रांमुळे कित्येक खेळाडूंना इजेवर मात करत आणि अधिक चांगल्या रीतीने प्रशिक्षित होत स्वतःची क्षमता वाढवायला मदत झाली आहे.

पोहण्यामुळे जुनाट रोग बरे होऊ शकतात तसेच उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि लवचिकता वाढविण्यास पोहणे उपयुक्त आहे. योगामुळे हातपायांची ताणण्याची क्षमता वाढत आणि पाठीच्या स्नायूंना मजबुती लाभत पोहण्याच्या फायद्यात भर पडते. प्राणायामामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारून त्यांची श्वसन क्षमता वाढायला मदत होते.

तुम्ही पूर्वी कधीही योग किंवा प्राणायाम केला नसेल तरीही काळजी करू नका. सोबत दिलेली योगासने आणि प्राणायाम तुम्ही अवघ्या काही दिवसांतच आत्मसात करू शकता.

Yoga for Swimmers

कपालभाती प्राणायाम

या प्राणायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील नाड्या म्हणजेच सूक्ष्म ऊर्जा मार्ग मोकळे होतात, परिणामी शरीराच्या कार्यप्रणालीत सुधारणा होते.

 

Yoga Exercise for swimmers

बध्दकोनासन

जर ताठर कुल्ल्यांमुळे तुमची नेहमी चिडचिड होत असेल, तर ह्या आसनामुळे त्याचे योग्यपणे निराकरण होईल. मांड्या व गुडघ्यांना या आसनाने चांगला ताण मिळतो आणि मांड्यांचे स्नायू व नितंबाच्या भागाची लवचिकता वाढते.

Yoga Sequence for swimmers

वीरभद्रासन

या आसनामुळे पाठीचा खालचा भाग आणि हातपायांना मजबुती आल्याने कोणतीही इजा वा स्नायूंची ओढाताण होणे टाळता येते हेच या आसनाचे वैशिष्ट्य आहे. या आसनाच्या सरावाने खांद्याच्या स्नायूमधील तणाव कमी होऊन आपली क्षमता वाढते.

Yoga Sequence for Swimmers

अधोमुख श्वानासन

आपल्या पाठीचा कणा ताणण्यासाठी, छातीच्या स्नायूंना बळ देण्यासाठी तसेच फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी हे उपयुक्त आसन आहे. यामध्ये शरीराच्या होणाऱ्या उलट्या स्थितीमुळे मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे डोकेदुखी, निद्रानाश, थकवा इ. समस्या दूर होतात. या आसनाने हात, खांदे, पाय, तळपाय मजबुत होतात जी प्रत्येक पोहणाऱ्याची गरज आहे.

Yoga Workout for Swimmers

सेतूबंधासन

या आसनामुळे पाठीचा थकवा त्वरित कमी होतो, छातीचे स्नायू, मान आणि पाठीचा कणा ताणला जातो आणि पाठीच्या स्नायूंना ताकत मिळते. या आसनामध्ये फुफ्फुसे मोकळी होतात ज्यामुळे चिंता, तणाव आणि औदासिन्य यांचे शमन होते.

 

Swimming Yoga

 धनुरासन

धनुरासन हे पाठीला मजबुती देणारे सर्वोत्तम आसन आहे. या आसनामुळे हाता पायांच्या स्नायूंची लवचिकता वाढते, पाठ लवचिक होते आणि छाती, मान आणि खांदे विस्तारतात.

 

 

Yoga poses for swimmers

योगनिद्रा

यामुळे शरीराला गहरी विश्रांती प्राप्त होत मन शांत आणि सुसंवादी व्हायला मदत होते. पुनः चैतन्य प्राप्त करून देणारे हे आसन असल्यामुळे पोहण्याच्या अगोदर आणि नंतर याचा सराव करणे उपयुक्त ठरते.

 

पोहण्याच्या वेळेत आपण बाह्य जगतापासून पूर्णतः अलिप्त होतो, तसेच त्या वेळी काहीही ऐकू येत नसते. हा थोड्या वेळासाठी मिळालेला अपार शांतीचा अनुभव तुमचे तणाव दूर करून मन शांत आणि प्रफुल्लित करतो. पोहणे झाल्यावर ध्यान केल्यास तीच गहन शांतता आणखी जास्त वेळासाठी अनुभवता येते. त्यामुळे सजगता, एकाग्रता आणि क्षमता वाढते.

योग्य आहारपद्धती आणि निद्रेबध्दल प्राचीन ग्रंथांमध्ये खूप भर दिला आहे. शरीराची स्वतःची रोगनिवारक क्षमता असते त्यात औषधे, वेदनाशामक आणि व्यायाम हे आणखी भर घालत असतात. आठ तासांच्या गाढ झोपेची बरोबरी कोणतीही औषधे करू शकत नाही. तसेच शरीराला सकस आणि पौष्टिक आहार पुरविणेही गरजेचे असते. पोहणे हा शरीराचा कस काढणारा व्यायाम आहे आणि त्याची पूर्तता ताज्या, परिपूर्ण आहाराने करणे आवश्यक असते. घरीच शिजविलेले ताजे अन्न आपला रोगांपासून बचाव करते आणि आपणास निरोगी ठेवते.

जर याबाबत शिस्त पाळली नाहीतर आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम होतो, त्यामुळे तुमची ऊर्जा झपाट्याने कमी होते. प्राणायामा मुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढत श्वसन क्षमता सुधारते. परिणामी आपली ऊर्जा व दमसास वाढून आपण जास्त वेळेपर्यंत सहज पोहू शकतो.

योग, प्राणायाम, ध्यान आदींच्या साह्याने आपले मन शांत होते, क्षमता वाढते आणि शरीर तंदुरुस्त होते, ज्यामुळे कसल्याही शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेपासून आपण दूर राहू शकतो.