ध्यान : मनासाठी वातानुकुलीत यंत्र (Air conditioned mind in Marathi)

श्री श्री रविशंकर :

ध्यान म्हणजे मनासाठी असलेले वातानुकुलीत यंत्र आहे – अगदी सुखकारक.  सुख सर्वांनाच हवे असते पण पूर्णपणे सुखात कसे राहायचे हे माहित नसते. मी ध्यानाच्या फायद्यांबद्दल बोलणार नाही. ते तुम्ही गुगलवर शोधू शकता. काही श्रेष्ठ लोकांनी ध्यानावर बरेच संशोधन केले आहे,ते तिथे उपलब्ध आहे. आपण यशस्वी ध्यानाच्या चार पद्धतींचा विचार करुया.   

 

  • पाहिला मार्ग आहे योग आणि व्यायामाचा. जेव्हा आपण एका विशिष्ट लयीमध्ये काही आसने करतो तेंव्हा काहीसा थकवा येतो आणि मन ध्यानात उतरते. जर्तुम्ही खूप काम केलेअसेल किंवा खूप्जास्त विश्रांती घेतली असेल, तर तुमचे ध्यान लागणार नाही. पण जेव्हा शरीर योग्य प्रमाणात थकलेल्या स्थितीत आहे, खूप जास्त थकलेले नाही असा समतोल साधला तर संपूर्ण शरिर संस्था ध्यानात उतरते.  
  • दुसरा मार्ग आहे प्राण किंवा श्वासाचा. प्राणायामाच्या तंत्रांमुळे मन शांत आणि स्थिर होते. आणि अगदी सहज ध्यान लागू शकते.  
  • तिसरा मार्ग आहे ज्ञानेंद्रियांचा- दृष्टी, श्रवण, चव, वास आणि स्पर्श. हे जग पंचमहाभूतांच्या निनिराळ्या मिश्रणातून बनले आहे. पृथ्वी, जल, अग्नी , वायू, आणि आकाश. डोळे हे अग्नी तत्वाशी जोडलेले असतात.वास हा पृथ्वी तत्वाशी, चव ही जल तत्वाशी, ध्वनी आकाश तत्वाशी आणि स्पर्श वायू तत्वाशी जोडलेले असतात.

तुम्ही यापैकी कोणत्याही एका ज्ञानेंद्रियाच्या मार्गे त्याच्या पलीकडे जाऊन अतिशय गहिऱ्या ध्यानस्थ स्थितीशी एकरूप होऊ शकता. कोणतेही एक ज्ञानेंद्रिय वापरून त्यात १०० % एकाग्र झालात तर तुम्हाला ध्यानस्थ स्थिती प्राप्त होऊ शकते. एखाद्या दिवशी आडवे पडून आकाशाकडे बघत रहा किंवा जेंव्हा तुम्ही पूर्णपणे एकाग्र होऊन संगीत ऐकत असाल तर एक क्षण असा येतो की तुम्ही अगदी स्थिर होऊन जाता. मनात काहीही विचार नसतात. तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळत नसते पण तुम्ही आहात याची तुम्हाला जाणीव  असते आणि तुम्हाला कोणत्याही सीमा  नसतात. सगळीकडे केंद्रबिंदू आणि परीघ कुठेच नसल्याचा अनुभव. एखादी आश्चर्यचकित करणारी गोष्ट किंवा नवल यानेसुद्धा तुम्ही अशा स्थितीत पोहोचता. जेंव्हा तुमच्या मनात “वाह !” असे येते तेव्हा मन नसते, कुठला विचार नसतो , तुम्ही फक्त असता.त्याचेच ध्यान लागते.

  • चौथा मार्ग आहे भावनेचा. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही  प्रकारच्या भावनांच्या द्वारे तुम्ही ध्यानात जाऊ शकता. तुम्हाला खूपच खराब वाटत असेल किंवा खूप राग आला असेल तेव्हा तुमच्या तोंडून उद्गार निघतो, “मी हरलो”, “बस !आता आणखी सहन नाही होत”, त्या क्षणांमध्ये तुम्ही जर हताश किंवा निराश झाला नाहीत, किंवा हिंसक झाला नाहीत तर तुमच्या असे लक्षात येईल की, त्या क्षणी मनाचा काही संबंध नसतो. मन अगदी स्थिर असते.
  • पाचवा मार्ग आहे बुद्धी, ज्ञान, सजगता यांचा. याला म्हणतात ‘ज्ञान योग’. बसल्या बसल्या तुम्हाला कळते की हे शरीर करोडो पेशींपासून बनलेले आहे. आणि तुमच्यात काहीतरी होते,काही तरी चेतवले जाते. कुणी एखाद्या अंतराळासंबंधीच्या वस्तुसंग्रहालयात जाते किंवा विश्वाबद्दलचा एखादा चित्रपट बघते त्यावेळी खोलवर आत काहीतरी होते,ठिणगी पडते. अशा अनुभवातून बाहेर येऊन तुम्हाला पटकन कुणावरही ओरडता येत नाही. ते जवळ जवळ अशक्यच होते कारण, जेव्हा विश्वाची भव्यता लक्षात येते तेंव्हा सगळा संदर्भच बदलतो. तुम्ही कोण आहात?तुम्ही काय आहात ? तुम्ही कुठे आहात ? या अगाध, अनंत विश्वाच्या तुलनेत तुम्ही कसे आहात ? त्या क्षणी तुमच्यात काहीतरी बदल घडतो.  

 

ध्यान म्हणजे अगदी स्वाभाविक असणे, स्वत:बरोबर आणि विश्वातल्या प्रत्येक गोष्टीबरोबर अगदी घरच्यासारखे आरामशीर असणे. तुम्हाला फक्त गहिरी विश्रांती कशी घ्यायची हे माहित असायला हवे.तुम्ही जर मालिश करून घेण्याच्या टेबलावर असाल तर तुम्ही काय करता ? तुम्ही त्या मालिश करणाऱ्याला त्याचे काम करू देता. मालिशवाला त्याचे काम करतो आणि तुम्ही काहीच करत नाही. ध्यानातही अगदी तसेच आहे. तुम्ही काहीच करायचे  नाही, निसर्गाला तुमची काळजी घेऊ द्या. कुठल्याही प्रकारचे प्रयास सोडून द्या कारण प्रयासाने आपण भौतिक गोष्टी कमावतो आणि ते अगदी मर्यादित असते. प्रयास ही भौतिक जगाची भाषा आहे. तुम्ही जर कष्ट केले नाहीत तर तुम्ही पैसे कमावू शकत नाही किंवा घर बांधू शकत नाही. तुम्ही अभ्यास करू शकत नाही आणि चांगले गुण मिळवू शकत नाही. नुसते बसून आणि विचार करून ह्या गोष्टी मिळत नाहीत. भौतिक स्तरावर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयास करावे लागतात. पण एखादी अध्यात्मिक गोष्ट मिळविण्यासाठी अगदी उलटे तंत्र असते – अजिबात प्रयास करणे नाही ! काही क्षण नुसते बसायचे आणि काहीही करायचे वगैरे नाही. अध्यात्मिक स्तरावर सगळे प्रयास सोडून द्यायचे आणि मग तुम्ही फार मोठे असे काही तरी कमावता.

श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य  www.artofliving.org

Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri