व्यसने आणि संकल्प | Habits and vows in Marathi

ज्यांना व्यसनमुक्ती हवी आहे त्यांच्यापुढे व्यसनातून मुक्त कसे व्हायचे हा एक मोठा प्रश्न असतो. सवयी त्रासदायक आणि बंधनकारक असतात. म्हणून आपणास त्यापासून सुटका हवी असते. व्यसने कष्टदायक, बंधनकारक असतात, जीवन सीमित बनवतात. पण जीवनाला मोकळेपणा हवा असतो. जीवनाला मुक्ती हवी असते. पण मुक्ती कश्यामुळे मिळेल हे  आत्म्याला समजले नाही तर तो जीवनभर मुक्तीच्या शोधात भटकत रहातो. 

संकल्प ज्याला आपण ‘संयम’ ही म्हणू शकतो हा एकमेव सवयीतून मुक्त होण्याचे साधन आहे. प्रत्येकाच्यात थोडाकां होईना संयम असतोच. संकल्प कालबध्द असायला हवा. त्यामुळे आपण सदाचारी बनतो व हटवादीपणा सोडून देतो. स्थळ- काळ लक्षात घेऊन संकल्प करा.

नको त्या विचारांमध्ये मन अडकले की दोन गोष्टी होतात. एक म्हणजे मनात जुन्या आठवणी येत रहातात आणि मन खिन्न होऊन परिणामी आपण स्वतःला दोष देऊन लागतो आणि आजपर्यंत आपली  काही प्रगती झाली नाही असे वाटू लागते. असल्या वैफल्यग्रस्त भावना म्हणजे आपल्या संयमांची क्षमता पडताळून पाहण्यासाठी मिळालेली एक संधी आहे असे समजल्याने आपल्याला बरं वाटतं.  संयमाशिवाय जीवन आनंदी राहू शकत नाही, आपले शरीर आजारांचे घर बनेल. बघा  एका वेळी तीन तीन आईस्क्रीम खाल्ल्याने किंवा दररोज आईस्क्रीम खाल्ल्याने आपण आजारी पडू.  जीवनात चैतन्य नसेल किंवा  जीवन नीरस असेल तर आपल्याला सवयी बंधनकारक ठरतात. पण जीवनाला एक ठराविक दिशा/उद्देश असेल तर संयमाने आपण आपल्या सवयींवर ताबा ठेऊ शकतो.

स्थळ- काळ लक्षात घेऊन संकल्प घ्या. उदाहरणार्थ,  एखाद्याला सिगारेट ओढायची  सवय असेल आणि तो म्हणत असेल, "मी सिगारेट सोडतो" पण प्रत्यक्षात ते सोडू शकत नाहीत. अशा वेळी संकल्पाचा, संयमाचा काळ ठरवायचा तीन महिने वैगेरे.,  तेवढ्या वेळेसाठी संकल्प घ्यायचा. त्याचप्रमाणे दुसऱ्या विषयी वाईट बोलायची अथवा प्रत्येक गोष्टीत शपथ घ्यायची सवय असेल तर दहा दिवस वाईट बोलणार नाही असा संकल्प करायचा. आजीवन वाईट बोलणे सोडेन असा संकल्प घ्यायचा नाही कारण तो टिकू शकत नाही. समजा घेतलेला संकल्प मध्येच मोडला तरी काही हरकत नाही. पुन्हा सुरू करायचा व असे करत रहायचे. हळूहळू तो आपल्या स्वभावात समाविष्ट  होऊ लागतो.

ज्या सवयी क्लेशकारक असतात त्यांना अशा प्रकारे संयमाने संकल्पाशी बांधायचे. आज जे सत्संगाला आले आहेत त्या सर्वांनी कालबध्द संकल्प घ्या आणि त्यावर लक्ष ठेवा. संकल्प मध्येच मोडला तर त्याची तारीख- वेळ नोंदवून ठेवा. पुढच्या सत्संगामध्ये  याविषयी बोला आणि  पुन्हा संकल्प घ्या. संयमावेळी त्रास देणाऱ्या सवयीदेखील  संकल्पाने बांधून ठेवा.

- श्री श्री रविशंकर जींच्या प्रवचनांतून