श्रद्धा असणे (Keeping the faith in Marathi)

श्री श्री रविशंकर :

जीवनात विकासाच्या दिशेने वाटचाल करताना तीन गोष्टींवर श्रद्धा असावी लागते. समाजाच्या भलेपणावर आणि  देवावर. तरीपण नुकत्याच केदारनाथावर ओढवलेल्या प्रसंगात अनेकांना प्राण गमवावे लागले. हे बघितल्यावर प्रश्न पडतो की ‘देव खरंच अस्तित्वात आहे का ?’ जर असेल तर तो त्याच्या भक्तांना असे का करेल ? अशा प्रसंगातच श्रद्धा डळमळीत होते आणि ती नाहीशी होण्याची शक्यता असते. अशाच प्रसंगात खरे तर श्रद्धेची सर्वात जास्त गरज असते. आपण हे लक्षात ठेवायला हवे की देव खरे तर नि:पक्षपाती आहे. तो सगळीकडे आहे. एखाद्या विशिष्ठ ठिकाणी खिळून राहिलेला नाही. तीर्थस्थाने जरी मनाला समाधान देणारी आणि श्रद्धेची तार छेडणारी अशी उच्च ऊर्जा असणारी स्थाने असली तरी अशा ठिकाणी जेव्हा अरिष्ट येते तेव्हा जे मरण पावतात ते त्याला प्राप्त करतातच, जे वाचतात ते त्याचे धन्यवाद मानतात आणि त्यांची श्रद्धा दृढ होते. पण मृत्यू पावलेल्या नातेवाईकांच्या श्रद्धेची परीक्षा असते. त्यांना पुन्हा पुन्हा हा प्रश्न पडतो की “का ? का ? का ?” आणि ते नकारात्मकतेने झुकणे अगदी साहजिक आहे. जेव्हा तुमचे आप्त स्वकीय अचानक तुम्हाला सोडून जातात तेव्हा तुमची श्रद्धा हादरून जाते. पण श्रद्धाच तुम्हाला या दुर्दैवी अनुभवातून बाहेर काढू शकते. 

श्रद्धा घालवून आपल्याला काहीच मिळत नाही. खरे तर संकट काळात श्रद्धाच आपले मन कणखर बनवते आणि कोसळून पडण्यापासून वाचवते, नैराश्य येते आणि दूषणे दिली जातात तेव्हा तर जास्तच. ही प्रार्थना करण्याची वेळ आहे. जेव्हा भीती आपल्या मनाला घेरून टाकते तेव्हा प्रार्थनाच स्थैर्य देते. जे गेले त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना या घोर दु:खातून बाहेर पडण्याची शक्ती मिळावी यासाठी आपण प्रार्थना करुया.

ज्यांचे जीव वाचवले गेले त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहूया. या संकटसमयी स्वयंसेवक ज्या आपलेपणाने मदतीसाठी पुढे आले त्यावरून हे दिसून येते की लोकांमध्ये अजूनही माणूसकी टिकून आहे. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या बातम्यांमुळे कदाचित ती झाकाळून जात असेल पण समाजातील माणूसकीवरची श्रद्धा आपण घालवता कामा नये. सगळेच ठग आणि चोर आहेत असे जर आपण धरून चालू लागलो तर काहीच करू शकणार नाही. पुढे जाण्यासाठी लोकांवर आणि आपल्या सभोवतीच्या जगावर विश्वास असणे आवश्यक आहे.

अंतत: स्वत:वर विश्वास असणे महत्वाचे. आपल्याला जमेल तितके आपण करत राहायला हवे. उदाहरणार्थ : हजारो लोक आपल्या तीर्थस्थानांना भेटी देतात पण तेवढ्या मोठ्या जमावाची सोय करण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. काही ठिकाणांचा अपवाद सोडला तर दुर्लक्षामुळे अनावस्था आहे. नैसर्गिक आपत्ती तर आपण  टाळू शकत नाही पण आपण त्यांना तोंड देण्याची तयारी तर करू शकतो. तसेच त्यांच्या परिणामांचा जोर आणि प्रमाण कमी करू शकतो. केदारनाथ आणि अशाच इतर ठिकाणी चांगले रस्तेही नाहीत. अमरनाथला जाणारा रस्ता तर काही फुटांचा आहे आणि एकाच वेळी लाखो लोक वर खाली, जा ये करत असतात.

बालतालहून जाणारा सर्वात जवळचा रस्ताही १४ कि.मी.चा चालत जाण्याचा डोंगराळ रस्ता आहे. जिथे विश्रांती घेण्यासाठी किंवा आपत्कालीन मदतीसाठी काहीही सोय नाही. अशा ठिकाणी जिथे इतक्या मोठ्या संख्येने लोक येतात तिथे त्या दृष्टीने सोयी सुविधा, वैद्यकीय मदत, वाहतुकीची साधने आणि संपर्काची साधने इत्यादी गोष्टी विकसित करणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर केदारनाथ महापुरामुळे अशा तीर्थस्थानी जाण्याबद्दल लोकांच्या मनात बसलेल्या भीतीवरही काम करायला हवे. विमान अपघात होतात म्हणून काही आपण हवाई प्रवास थांबवत नाही किंवा रस्त्यावर अपघात होतात म्हणून रस्त्यावर जायचे थांबत नाही. अश्रद्धेमुळे आपण अशा घटनांमळे भयभीत होतो. आपल्याला हरवलेले, दिशाहीन वाटू लागते. कठीण प्रसंगातच आपल्यातले सुप्त असलेले धैर्य आणि क्षमता अनेक प्रकाराने बाहेर येतात. अढळ श्रद्धाच आपल्याला, अगदी प्रलयकाळीसुद्धा हसत रहाण्याचे सामर्थ्य देते.    

श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य  www.artofliving.org/mr

Follow Gurudev Sri Sri Ravi Shankar on twitter @SriSri