१४० टनांची स्वच्छता मोहीम - गुरु माउली उत्सव !!

"ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" चा गजर करीत पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांच्या पालखीच्या सोहळ्याबद्दल तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही महाराष्ट्रात राहूच शकत नाही. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका घेवून वर्षानुवर्षे दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरला चालत जात असतात.

गुरु माऊली प्रकल्प

पंढरपूर ची वारी हा वारकऱ्यांचा वार्षिक पालखी सोहळा असतो. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात पण या भक्तीच्या उच्चतम क्षणानंतर मागे राहते ते धुळीने माखलेले आणि अप्रिय वातावरण. अपुऱ्या स्वच्छतेच्या सुविधा, जागरूकता आणि लोकशिक्षणाचा अभाव या कारणाने पालखी पुढे सरकली की त्या ठिकाणी उरते ती अस्वच्छता आणि दुर्गंधी.

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र YLTP यांच्या पुढाकाराने गुरु माउली हा प्रकल्प हाती घेतला आहे. काही आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक (टीचर्स) आणि स्वयंसेवक यांनी एकत्र येवून या जागेचे पावित्र्य राखून ठेवण्यासाठी या पालखी मार्गावर स्वच्छता मोहीम हाती घेतली ज्या मुळे बरेच स्वयंसेवक प्रोत्साहित झाले. या वर्षी त्यांनी आळंदी आणि पंढरपूर या ठिकाणी स्वच्छते मोहिमे साठी भर दिला.

प्रथम मोहीम आळंदी

२९ जुलै २०१६ रोजी साधारणपणे ५०० स्वयंसेवक एकत्र येवून आळंदी, आसपासचा सर्व परिसर आणि इंद्रायणी नदीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंग च्या स्वयंसेवकांनी अंदाजे ४.५ टन केरकचरा गोळा केला.

आळंदीतीत झालेल्या स्वच्छता मोहिमे पासून प्रेरित होऊन बऱ्याच साधकांनी हडपसर पुणे इथे दुसरी स्वच्छता मोहीम सुरु केली. पालखी हडपसर पासून पुढे निघाल्यानंतर १०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी तो परिसर स्वच्छ केला.

स्थानिक गावकरी, लहान मुले या मोहिमे मुळे प्रोत्साहित झाले आणि आमची मदत करायला धावले आणि आमच्या बरोबर काम केले, काहींनी या मोहिमेला लागणारे साधने दिली. हा एक ह्र्द्यस्पर्शी अनुभव होता असे अनेकांनी खालील काही शब्दात सांगितले.

“पालखी पुढे सरकली की मागे राहिलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी बराच कालावधी जायचा त्यामुळे भयंकर त्रास सहन करावा लागत असे पण आर्ट ऑफ लिव्हिंगने हे जे कार्य केले आहे ते प्रेरणादायी आहे आणि हीच खरी सेवा आहे. आम्ही खूप आभारी आहोत”.

स्वच्छते मोहिमेचा अंतिम टप्पा – पंढरपूर

स्वच्छतेच्या दोन यशस्वी मोहिमेमुळे बरेच लोकं यापासून प्रोत्साहित झाले आणि दिनांक १७ जुलै २०१६ रोजी पंढरपूर येथे हजारो जण या मध्ये सामील झाले होते आणि आश्चर्य रित्या जवळ जवळ ५००० पिशव्यातून १२० टनापेक्षा जास्त केरकचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेमध्ये बरेच सामाजिक गट त्यांच्या गट नेते बरोबर सामील झाले होते आणि एकाच वेळी विविध भागात केरकचरा गोळा करण्यात आला.

लोणंद मधील एक गटाने १५० स्वयंसेवकांना घेवून लोणंद गाव आणि आसपास चा परिसर स्वच्छ केला. नगरपालिकेने तो केरकचरा पुढील प्रक्रीये साठी नेला आणि मागे राहिले ते स्वच्छ सुंदर दुर्गंधी रहित शहर.

माजी जिल्हापरिषद अध्यक्षा, सोलापूर  म्हणतात " आर्ट ऑफ लिविंग करत असलेले हे सेवेचे काम बघून मी स्वतः कुटुंबसहित यात योगदान दिले. पूर्ण शहर स्वच्छ झाल्याने दरवर्षी पसरणारे कोणतेही साथीचे रोग या वर्षी बिलकुल पसरले नाहीत. "

जय्यत तयारी

या मुख्य मोहिमेच्या तीन महिने अगोदर पासून तयारी चालली होती. श्री. जयंत भोले यांनी या स्वच्छते मोहिमेसाठी स्वयंसेवकांना प्रोत्साहित करण्यासाठी ८ ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बऱ्याच स्वयंसेवकांनी या मोहिमेला लागणारे बरेच औजार दान म्हणून दिले. या प्रचंड मोठ्या अशा स्वच्छता मोहिमे साठी लोक जवळ जवळ ६०० कि.मी. अंतर प्रवास करून या मध्ये सामील झाले होते. (पुणे, सातारा, सोलापूर, अमरावती, अहमदनगर, जळगाव, नासिक, उस्मानाबाद, आणि बीड या शहरातून बरेच स्वयंसेवक आले होते). जयंत भोळेंबरोबर कामकारणाऱ्यांची काही नावे - सूर्यकांत जाधव, सुभाष माने, वंदना जैन, सुभाष बहुलेकर, वेंकटेश शिवा, अमर कळमकर, रघुराज चौहान.

जयंत भोळे म्हणतात "स्वच्छतेच्या श्री श्री रविशंकर जींनी दिलेल्या या संदेशा मुळे बरेच लोक प्रोत्साहित झाले आहेत त्यामुळे ते एकत्र आले आणि एक संघ म्हणून सेवा केली त्यामुळेच हा मोठा बदल घडून आला."

 

पुढील मोहीम ही अरण येथे – आपल्याला सामील व्हायचे आहे कां?

अरण हे संत सावता माळी यांचे गाव. दर वर्षी इथे विठोबाच्या पादुका नेले जातात आणि म्हणून या वर्षी आम्ही दिनांक १ ऑगस्ट २०१६ रोजी अरण जि: सोलापूर इथे स्वच्छता मोहीम करण्याचे योजिले आहे.

पुढे काय?

महाराष्ट्रात ज्या पवित्र स्थळी यात्रा होतील किंवा पवित्र उत्सव होतील किंवा सामाजिक संमेलने होतील त्या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक पुढाकार घेवून ती स्थळे, ठिकाणे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतील. या प्रकल्पांतर्गत आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर असलेल्या गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन योजना आहे आणि या मोहिमेद्वारा गावांचा दीर्घकालीन शाश्वत विकास करणे हे ध्येय आहे.

हा खरा स्वच्छतेचा उत्सव आहे – गुरु माउली उत्सव !!!

या सारख्या प्रकल्पांमध्ये योगदान देण्यासाठी किंवा काही प्रतिसाद देण्यासाठी इ मेल- webteam.india@artofliving.org