दिवाळीमधल्या ५ दिवसांचे महत्व | Five days of Diwali in marathi

दीपावली हा संस्कृत शब्द आहे. ह्याचा अर्थ 'दिव्यांच्या ओळी'. भारतीय कॅलेंडर नुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर (अंधकार) विजय म्हणून प्रतित होतो.

फटाके व आतिषबाजी

क्रोध, मत्सर असो वा भय, ह्या सर्व नकारात्मक भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाल्या असतील त्यांचा, फटाक्यांच्या रुपात  स्फोट व्हायला हवा. तूमच्या मनात जर कुणाबद्द्द्दल काही नकारात्मक भाव असेेेल तर तो  फटाक्या सोबत फोडून नष्ट करा, किंवा ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल त्याचे नाव  त्या फटाक्या वर लिहून फोडा व त्या सोबतच तो द्वेष नष्ट झाला असे समजा. पण आपण काय करतो? तो नकारात्मक भाव नष्ट करण्याऐवजी, त्या व्यक्तीलाच नष्ट करायला बघतो अथवा स्वतःला त्या भावनांच्या आगीत होरपळून घेतो.

नकारात्मक वाईट भावना फटाक्यांच्या स्फोटात नष्ट करा व त्या व्यक्तीसोबत नव्याने मैत्रीचा हात समोर करा. मग बघा, तुम्हाला आतून कसं हलकं फुलकं वाटेल व आनंद, प्रेम शांतीची अनुभूती लाभेल. त्या नंतर, त्या व्यक्ती सोबत तोंड गोड करा व दिवाळी साजरी करा. ती व्यक्ती नव्हे, त्याच्या अवगुणांचा फटाक्यां सोबत नाश करणे, हीच खरी दिवाळी होय. ह्या उत्सवाची सुरुवात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी पासून होते.

1

धनत्रयोदशी | Dhanteras

दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करुन सजविले जाते. धन व ऐश्वर्या ची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे  दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतिक्षे नंतर चे आगमन दर्शविण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे छोटे पदचिन्ह काढल्या जातात. रात्रभर दिव्यांची आरास केल्या जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने, ह्या दिवशी गृहिणी सोनं वा चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशु धनाची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो. ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनचं ह्याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यू चे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते.

 

2

नरक चतुर्दशी | Naraka Chaturdashi 

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. ह्या सणाची  एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर( नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व  देव आणि संतांच्या  सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले. नरक चतुर्दशी च्या दिवशी भगवान श्रीकृष्णा ने ह्या दानवाचा वध करून, त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केलीत. त्या महिलांनी    सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्ती वर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे.

 

3

लक्ष्मीपूजन | Lakshmi Pooja

दिवाळीचा तिसरा दिवस, सर्वात महत्वाचा, लक्ष्मी पूजन. ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही ह्या दिवसाला अतिशय शुभ मानल्या जाते.

छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारल्या जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धी च्या आशिर्वादाची लूट करते असे मानल्या जाते. सायंकाळी लक्ष्मी पूजन केल्या जाते आणि घरी बनविलेल्या मिठाई चे सर्वांना वितरण केले जाते. 

हा अतिशय शुभ दिन मानल्या जातो, कारण ह्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. ह्या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचा  समावेश आहे. ह्याच दिवशी प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणा सोबत, १४ वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते.

दिवाळीच्या ह्या दिवसाबद्दल एका रोचक कथेचा कटोपनिषद मध्ये उल्लेख आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्री सारखे  भयाण असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यू ची काळोखी गुहा  पार केल्या नंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो.आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंकां दूर सारून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला.

 

 

4

गोवर्धन पूजा (बली प्रतिपदा) | Govardhan Pooja

दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

 

5

भाऊबीज | Bhaubij

भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात.

अशी मान्यता आहे की धनाची देवता श्री लक्ष्मी ही अतिशय चंचल असून, जिथे खूप मेहनत, प्रामाणिकता व कृत्यज्ञतेचा भाव आहे, तिथेच तिचा वास असतो. श्री मद भागवतात असा उल्लेख आहे की, लक्ष्मी मातेने बळी राजाच्या शरीराचा त्याग केला व ती इंद्र देवासोबत जाऊ इच्छित होती. कारण विचारले असता तिने सांगितले की, जिथे सत्य, दान, तप, पराक्रम आणि धर्माचे संवर्धन होते, तिथेच तिचा वास असतो.

 

येत्या दिवाळीत आपण सारे प्रार्थना करू या व आभार व्यक्त करू या. ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समृद्धीचा दरवळ असो व सर्व लोकांना प्रेम, आनंद व विपुलता लाभो.