अठरा वर्षात बदलले सात हजार कैद्यांचे जीवन. अरुणाजी शिकवतात हॅपीनेस चा मंत्र

७३ वर्षीय अरुणा सरीन जबलपुरातील सुभाषचंद्र बोस मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना शिकवत आहेत हॅप्पिनेसचा मंत्र..

जबलपुर (अनुकृती श्रीवास्तव) : दिवसभर शिव्या शाप देणारे कैदी हैप्पीनेस ची चेष्टा करायचे. तणाव तर त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. परंतु आत्ता ते शिस्तप्रिय झालेत. दिवसाची सुरवात प्रार्थनेने होते. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वागणे सुधारले आहे. आपण हे बोलत आहोत जबलपूरच्या सुभाषचंद्र बोस मध्यवर्ती कारागृहाबध्द्ल. कैद्यांच्या जीवनात हा बदल शक्य झाला आहे अरुणा सरीन यांच्यामुळे. २००० सालापासून त्या येथील कैद्यांना आनंदी राहण्याचा मंत्र शिकवत आहेत.

सुरवातीला कोणी काही शिकायला तयार नव्हते. अथक प्रयत्नांनी त्यांनी योग आणि ध्यान यांच्या माध्यमातून कैद्यांना एकत्र आणले, जोडून ठेवले. या अठरा वर्षात सात हजार कैद्यांना आनंदाचे रहस्य उमगले आहे. निवृत्त प्राचार्या अरुणा सरीन ७३ वर्षाच्या आहेत. पण दररोज सकाळी आठ ते दहा कारावासात कैद्यांना योग आणि ध्यान शिकवतात. या वेळेत तेथील सर्व कैदी योगशाळेत येऊन याचा लाभ घेतात.

ठराविक कैद्यांवर जास्त लक्ष

आर्ट ऑफ लिविंगच्या प्रशिक्षिका सरीन सांगत होत्या, “जेलमध्ये सर्व प्रकारचे कैदी असतात. काही शिकले सावरलेले असतात परंतु भावनेच्या भरात, रागाने त्यांच्या हातून गुन्हा घडून गेलाय. काही कैद्यांनी जाणून बुजून गुन्हे केलेत आणि वारंवार जेल मध्ये आले आहेत. काही कैदी व्यवस्थित ऐकतात तर काही शिबिराला यायलाच तयार नव्हते. अश्या सर्वांमध्ये ताळमेळ राखणे गरजेचे होते. त्यामुळे काही कैद्यांवर विशेष लक्ष ठेऊन त्यांना शिबिराला घेऊन यावे लागायचे.”

पत्र लिहून देतात धन्यवाद

जेलच्या कल्याण अधिकारी सरिता घारू आपला अनुभव सांगत होत्या, “जे कैदी कधीही हसत नव्हते ते आत्ता आनंदी राहू लागले आहेत. शिबिराला कधीही वेळेवर न येणारे आत्ता शिबीर सुरु व्हायची वाट पहात बसतात. छोट्या छोट्या गोष्टींवर इतर कैद्यांसोबत भांडण काढणारे आणि सतत खोटं बोलणारे कैदी आत्ता त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चांगले वागताना आम्ही पाहतोय. येथून सुटून गेलेले कैदी आजदेखील पत्रे लिहून अरुणा सरीन यांना धन्यवाद देतात कि त्यांनी शिकवलेल्या योग आणि ध्यानामुळे त्यांचे जीवन अमुलाग्र बदलून गेले. अरुणा सरीन यांच्या चिकाटीमुळे जेलमध्ये योग ग्रुप बनला आहे. यामुळे जेल आत्ता सुधारगृह बनला आहे. आत्ता रात्रंदिवस कैदी नियमांचे पालन करतात. सगळी कामे वेळच्या वेळी होतात. कैद्यांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत.”

पतिच्या इच्छेची करताहेत अंमलबजावणी

खमरिया सेन्ट्रल स्कूलच्या निवृत्त प्राचार्या अरुणा सरीन यांचे पती कर्नल आर.सी.सरीन आर्ट ऑफ लिविंगशी संलग्न होते. त्यांचे सन २००० मध्ये निधन झाले. ते त्यांना सतत सांगायचे कि, ’तुला सेवा करायची असेल तर जेलमध्ये सेवा कर.’ त्यांच्या निधनानंतर त्यांनी जेलमध्ये योग आणि ध्यान घेणे सुरु केले.

Source - जागरण