ध्यानावर प्रश्न | गुरुदेव श्री श्री रविशंकर:

question & answer in Marathi

प्रश्न- १: ध्यान करताना माझ्या डोक्यात जी बडबड (आवाज ) चालते ती कशी थांबवू?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : याकरिता बरेच उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. प्रथम त्याचा स्वीकार करा आणि त्याला विरोध अथवा त्याच्याशी लढाई करू नका. तुम्ही त्याला विरोध करत बसता आणि तुम्हाला असे वाटते हा आवाज/ बडबड नको. जेवढे जास्त तुम्हाला त्याच्यापासून पिच्छा सोडवून घ्यावा असे वाटेल, तेवढेच जास्त ते तुम्हाला चिटकून राहील. चेतनेचे अथवा मनाचे तत्व असे आहे कि विरोध केल्याने ते कमी होण्यापेक्षा वाढतच जाते. म्हणूनच , तुम्ही प्रथम ते सोडून द्या त्याला विरोध करू नका. दुसरे म्हणजे ध्यानामध्ये जाण्याचे पाच वेगवेगळे मार्ग. श्वासाच्या मदतीने तुम्ही या आवाजातून / बडबडीतून बाहेर पडू शकता. सुयोग्य अन्नाचाही ध्यानावर चांगला परिणाम होतो . व्यायाम, शरीराची ढब(  बसण्याची स्थिती) आणि शुद्ध भाव -भावना , चांगली समज हे सर्व ध्यानाला मदत करतील.

 

प्रश्न -२: प्रिय गुरुजी , ध्यान करताना मी सजग असतो पण माझ्या शरीरात काहीही संवेदना नसतात तिथे फक्त 'मी असतो' आणि एकदम माझ्या शरीराला एक झटका बसतो आणि मी परत येतो. काय झाले असेल?

गुरुदेव श्री श्री रविशंकर: हे छान आहे, तुम्हाला आंतरिक स्थितीची झलक मिळाली आहे, जी चेतना तुम्ही आहात.हे स्वाभाविक आणि छानही आहे. पण आता असा प्रयत्न करू नका कि तोच अनुभव उद्याही व्हावा . नाही. तेच पुन्हा होणार नाही. रोज तिथे नवीन खजिना तुम्हाला मिळेल.म्हणूनच , फक्त तो अनुभव घ्या पण त्यातच अडकून पडू नका.तुम्ही त्या सगळया अनुभवांपेक्षा खूप मोठे आहात.

 

प्रश्न- ३:ध्यान करताना माझे मन अगदी शांत होते पण माझे मन त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मी अथक प्रयन्त करतो?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : हो, तुम्ही मनाच्या पलीकडे जाण्याचे अजिबात प्रयत्न करायचे नाहीत. तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही असे काही करू नका ,जसे आहे तसे राहू द्या. ठीक आहे?

जर तुम्ही मालिश करवून घेण्यासाठी त्या टेबलवर असाल, तुम्ही काय कराल? तुम्ही मालिश करणाऱ्याला तुमची काळजी घेऊ देता. हेच अगदी ध्यानासाठीही लागू आहे, तुम्ही काहीही करत नाही. निसर्गाला तुमची काळजी घेऊ द्या.  काळजी घेतली जाईल.

 

प्रश्न -४: ध्यानानंतर काही काळ मी माझ्या प्रतिक्रियांच्या पद्धतींबद्दल जागरूक असतो,जसे कि बचाव आणि राग. मी स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्यासाठी  कसे तयार करू ?

गुरुदेव श्री श्री रविशंकर : ज्या  तुम्हाला वाटतात कि तुमच्या पद्धती आहेत , ते सगळे असू द्या. 

जर तुम्ही हे ओळखायला/बघायला सुरुवात केली कि, "मी नेहमीच रागात आहे", "मी नेहमी बचावात्मक होतो " , मग तुम्ही भूतकाळात अडकलेले आहात किंवा काही पद्धतींमध्ये . म्हणूनच त्यांचा त्याग करा. त्या काल तिथे होत्या. त्या माझ्या अवकाशात आल्या. मग काय झाले?

काहीवेळा तुम्ही आकाशात काळे ढग पहाता, पण ते आकाशाचे नसतात. ते फक्त आकाशात येतात आणि जातात .त्यांना तेवढीच मुभा असते. तसेच, ह्या भावना येतात , कधी चांगल्या कधी वाईट. तुम्हाला त्यांचा त्याग केलाच पाहिजे.हि प्रथम पायरी आहे . त्यांना येऊ द्या आणि  जाऊ द्या.

 

प्रश्न -५: मी असे ऐकले आहे कि काही वर्ष ध्यान केल्याने त्या व्यक्तीचे पूर्ण आयुष्यच नित्य ध्यान असते . तुम्ही ह्याचा उलगडा कराल का?

गुरुदेव श्री श्री रविशंकर: हो! ती आतील शांतता कायम राहते जरी तुम्ही काहीही करत असाल . जरी तुम्ही चालत असाल ,बोलत असाल, खात असाल, गप्पा मारत असाल , बातम्या बघत असाल ,आणि त्यात काहीशी शांतता नेहमी असते. तुम्हाला त्याची सवय होते. ते तुम्हाला  सोडत नाही.

पण तरीही, असा विचार करत बसू नका,' मला ह्या प्रकारचा अनुभव कधी मिळेल ?'' 'हे कधीही होऊ शकते. चिंता कशाला? अशा प्रकारची वृत्ती हवी. सगळ्यात उत्तम म्हणणे आहे, 'ठीक आहे , असू दे'.

कबीरांनी दोह्यांमधे (कवितेमध्ये) सुंदर लिहिले आहे. ते मध्य काळात झालेले हिंदू संत आहेत. ते म्हणतात ते बरेच वेळा देवाला शोधण्यासाठी गेले, सगळीकडे बघितले, ' देव कोठे आहे? देव कोठे आहे?' ते म्हणतात ,' जेंव्हा मी देवाला शोधण्यासाठी गेलो , देव मला सापडलाच नाही. पण मी जेंव्हा सगळं सोडलं आणि निवांत झालो , देव माझ्या मागे होता, मला बोलावत होता , कबीर,कबीर,कबीर!" जेंव्हा त्यांनी देवाच्या मागे पळणे थांबविले , तेंव्हा देवाने त्यांच्यामागे पळायला सुरुवात केली. हे खूपच खरे आहे!

फक्त हे माहित करून घ्या कि गहन आराम कसा करायचा आहे काहीही प्रयत्न न करता. कारण प्रयत्न करून आपल्याला जे प्राप्त होते ते ऐहिक आणि सीमित असते. अध्यात्मिक मार्गात तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, जे सर्वोच्च आहे, त्याची परिभाषा प्रयत्न असू शकत नाही अथवा प्रयत्नांने ते मिळू शकत नाही.जेंव्हा तुम्ही सगळे प्रयत्न सोडून देता , तेंव्हा तुम्हाला काही तरी सर्वोच्च प्राप्त होते.ऐहिक स्तर हा पूर्ण अस्तित्वाच्या एक दशांश (१/१० ) आहे आणि अध्यात्मिक स्तर नऊ दशांश (९/१०).

हे बघा, प्रेम हे प्रयत्नांने जोपासता येत नाही, तुम्ही प्रयत्न करून दयावान होऊ शकत नाही, होऊ शकता का? 

तुम्ही असे म्हणू शकता का,'मी दयावान होण्यासाठी खूप प्रयत्न केले ?' तुमचे 'खूप प्रयत्न' म्हणजेच अडथळा. फक्त विश्राम करा आणि तुम्ही दयावान व्हाल. आनंदी होण्यासाठी तुम्ही फार कष्ट घेता. तेच तर आनंदाच्या प्रतिबंधाचे/ अटकावाचे कारक आहे. म्हणूनच प्रयत्न हि ऐहिक जगाची परिभाषा आहे. प्रयत्न न करता तुम्ही पैसे कमवू शकत नाही . तुम्ही अभ्यासही करू शकत नाही किंवा चांगले मार्क्सही मिळवू शकत नाही. जर तुम्ही काही प्रयत्न नाही केले तर तुम्हाला पदवीही मिळू शकत नाही .म्हणूनच ऐहिक जगात सर्व गोष्टींसाठी प्रयत्न गरजेचे आहेत. जसे घर बांधण्यासाठी नुसता घर बांधण्याचा विचार करण्याने घर बांधले जात नाही. पण काहीतरी अध्यात्मिक मिळविण्यासाठी फक्त उलटे करणे  गरजेचे आहे- प्रयत्न नको! काही क्षण बसून आणि जेवढे काही प्रयत्न आहेत ते न करता.

मला माहिती आहे तुम्ही मला म्हणाल काही न करणे हे अवघड आहे . शांत  राहणे  कठीण आहे .पण हे फक्त तसे भासते .फक्त इथे (अप्रयत्नात) काही दिवस आणि तुम्ही बघाल हे किती सहज आहे ते , खूपच सोप!

 

'गुरुदेव श्री श्री रविशंकर' यांच्या एप्रिल २०,२०१२ कॅलिफोर्निया येथील संवादांमधून उद्धृत केले आहे. या संवादांचे ज्ञान   पत्रक तयार केले आहे.