नटराज आणि चिदंबर रहस्य I Nataraja and the Chidambara Rahasya

नटराज रहस्य :

नटराज, नृत्य, तांडव करणारा शिव हा निसर्ग आणि दिव्यत्वाच्या एकत्रितपणाचे सुंदर प्रतिक आहे. नटराजाच्या एका हातातील अग्नी,अग्नी तत्वाचे प्रतिक आहे तर दुसऱ्या हातातील डमरू आकाश तत्व दर्शवतो. या ब्रम्हांडातील कित्येक शक्ती तत्व उदा. गुणसूत्रे किंवा आकाशगंगेचा आकार इत्यादी डमरू सारख्या आकाराचीच आहेत. काल देखील शंखाकृती असून तो अनंत आहे.

शिवाचे मोकळे आणि उडणारे केस, जटा वायू तत्व दर्शवतात. जमिनीवर रुतलेला एक पाय पृथ्वी तत्व दर्शवतो. दुसरा पाय हवेत अंतराळी आहे. एका हाताची अभय मुद्रा संरक्षण प्रदान करते तर दुसरा त्यांच्या पायाकडे निर्देशित करणारा हात समर्पणाचे प्रतिक आहे. हवेत अंतराळी उचललेला पाय “तू मला प्रिय आहेस“ म्हणत भक्ताकडे जाणारा आहे.

भगवत गीतेत श्रीकृष्ण देखील अर्जुनाला म्हणतात नां, “तू मला अतिप्रिय आहेस”. जेंव्हा तुम्ही कोणाला तरी प्रिय आहात हे जाणवते तेंव्हा हृदयामध्ये विश्वास आणि प्रेम निर्माण होतेच

शिव नृत्य करणारा आहे. जीवन असेच असायला हवे. जर दोन्ही पाय जमिनीवर असतील तर तुम्ही नृत्य करू शकत नाही.चालायचे जरी झाले तरी एक पाय उचलावा लागतो.
 

समस्त सृष्टी आनंदाने ओतप्रोत आहे.

समस्त सृष्टी आनंदाने न्हाऊन निघाली आहे.

समस्त सृष्टी आनंदासाठीच निर्मित आहे.

ज्या परमानंदासाठी हे जगत बनले आहे, नटराज त्याचेच प्रतिक आहे. या जगतातील हरेक अणू रेणू मध्ये कृती आणि विश्रामाची क्षमता आहे.शिव तत्व जडत्वाचे नव्हे तर अनंत शांती आणि परमानंदाचे प्रतिक आहे जे नृत्य करणारे आणि शांततापूर्ण आहे.

नटराजाच्या पायाखाली अपस्मार म्हणजे इच्छा, आकांक्षा रुपी दानव आहे. तो इच्छा आकांक्षांच्या मस्तकावर पाय ठेऊन उभा आहे. या इच्छा आकांक्षांचा पगडा आपल्यावर असेल तर आपण दू:खी होतो. जेंव्हा आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर नृत्य करतो तेंव्हाच ते परमानंदाचे तांडव होईल. ही निव्वळ कल्पनाशक्ती नाही तर हेच सत्य आहे. ती ऊर्जा आपल्यामध्ये जागृत होते आणि आपण नाचू लागतो हेच सत्य आहे.समस्त सृष्टी दैवीशक्तीने व्यापणे हेच शाश्वत तांडव होय.

चिदंबर रहस्य:

चिदंबर असे स्थान आहे जिथे शिव आकाश तत्व प्रतीत करतो. या देवळाच्या गाभाऱ्याला एक पडदा आहे आणि पडद्यापलीकडे काहीच नाही, निव्वळ पोकळी आहे. ते तत्व जाणले तरच आपण शिव तत्वाचे रहस्य जाणू शकतो. जेंव्हा आपण भ्रम, मोह, इच्छा आणि आकांक्षांचा पडदा दूर सारतो तेंव्हाच आपण चिरस्थायी शांती अनुभवू शकतो. जेंव्हा काही काळासाठी आपले मन निर्विचार होऊन जाते तेंव्हाच आपल्याला त्या रहस्यमय तत्वाची काही क्षण अनुभूती होते आणि हेच क्षण जीवनात परिवर्तन घडऊन आणतात.

आकाश तत्व तीन प्रकारे वर्णिले जाते. भूताकाश-नश्वर देह. चित्ताकाश-विचार आणि भावना आणि चिदाकाश-अफाट आणि अगाध चेतनाशक्ती. प्राणऊर्जा चीदाकाशामध्ये जागृत होत असते. चिदंबर रहस्याचा अनुभव निव्वळ अध्यात्मिक मार्गावर स्व प्रयत्नाने प्रगती करत असू तरच अनुभवू शकतो.