दीपावली : प्रत्येक हृदयात प्रेमाचा दीप चेतवा! | Diwali in marathi

तेलाची पणती तेवण्यासाठी त्याची वात तेलात बुडालेली असावी लागते पण त्याचे टोक मात्र तेलाच्या बाहेर असावे लागते. जर वात पूर्णपणे तेलात बुडालेली असली तर ती प्रकाश देऊ शकणार नाही. आयुष्य हे दिव्यातल्या वातीसारखे आहे. तुम्हाला या जगात रहावे लागते पण त्याच्यापासून अलिप्तही रहावे लागते. जर तुम्ही जगातल्या भौतिक गोष्टींमध्ये पूर्णपणे बुडून गेलात तर तुम्ही जीवनात आनंद आणि ज्ञान मिळवू शकणार नाही. जगात राहूनही त्यातल्या संसारिक गोष्टीत बुडून गेला नाहीत तरच आनंदाचा आणि ज्ञानाचा प्रकाश पडू शकेल.    

 दिवाळी - पाच दिवसांचा उत्सव | diwali - 5 day celebration

हा पाच दिवसांचा उत्सव कार्तिक मासाच्या त्रयोदशीला सुरु होतो. पहिला दिवस धन त्रयोदशी, दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा, तिसऱ्या दिवशी अमावस्येला लक्ष्मी पूजन केले जाते. चौथ्या  दिवशी प्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि त्यानंतर द्वितीयेला असते भाऊबीज.

दिवाळी हा अशाप्रकारे निर्माण झालेल्या विवेकाच्या प्रकाशाचा सण आहे. या दिव्याच्या सणात चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय, प्रकाशाने अंधारावर मिळवलेला विजय आणि ज्ञानाने अज्ञानावर मिळवलेला विजय साजरा केला जातो. दिवे लावले जातात ते केवळ घर सजवण्यासाठी नव्हे तर जीवनातले हे गहिरे सत्य सांगण्यासाठी सुद्धा लावले जातात. विवेकाचा आणि प्रेमाचा दिवा प्रत्येक हृदयात लावा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रफुल्ल असे हास्य फुलवा.

प्रत्येक माणसात काही ना काही चांगले गुण असतात. आणि तुम्ही लावलेला प्रत्येक दिवा याचेच प्रतिक आहे. काहींमध्ये संयम असतो, काहींमध्ये प्रेम, सामर्थ्य, उदारता असते तर काहींमध्ये लोकांना एकत्र आणण्याची क्षमता असते. तुमच्यातील सुप्त गुण हे पणतीसारखे असतात. एकच पणती लावण्यात समाधान मानू नका, हजारो दिवे लावा कारण अज्ञानारूपी अंधःकार घालवण्यासाठी तुम्हाला खूप दिवे लावावे लागतील. तुमच्यातील विवेकाचा दिवा लावून आणि ज्ञान प्राप्त करून तुम्ही तुमच्यातील सर्व क्षमतांना जागवा. जेव्हा ते लावले जातील आणि तेवू लागतील तीच दिवाळी असेल !

दिवाळी - फटाक्यांचे महत्व | importance of crakers

आणखी एक महत्वाचे प्रतिक आहे ते म्हणजे फटाके. जीवनात बरेचदा तुम्ही फटाक्यासारखे होता, साचलेल्या भावना, नैराश्य,राग यांचा कधी स्फोट होईल नेम नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, इच्छा, नावड, तिरस्कार यासारख्या भावना दाबून ठेवता तेव्हा त्याचा कधीतरी स्फोट होणारच. फटाके फोडणे ही आपल्या पूर्वजांनी बाटली बंद भावना मोकळ्या करण्यासाठी तयार केलेली पद्धत आहे. जेव्हा तुम्ही बाहेर एखादा स्फोट बघता तेव्हा तुम्हाला तुमच्यातही तशाच भावना निर्माण झालेल्या जाणवतात. आणि स्फोटाबरोबरच केवढातरी प्रकाश निर्माण होतो. तर जेव्हा तुम्ही या भावनांचा निचरा करता तेव्हा पावित्र्य निर्माण होते. 

जोपर्यंत तुमच्यातील साचलेल्या भावनांचा निचरा होत नाही तोपर्यंत तुम्हाला नाविन्याचा अनुभव येणार नाही. दिवाळी म्हणजे वर्तमानात असणे. त्यामुळे भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची काळजी टाकून द्या आणि वर्तमान क्षणात रहा. भेटवस्तू आणि मिठाई, फराळ यांची देवाण घेवाण करण्याठी एक प्रतिकात्मकता आहे. भेटवस्तू आणि मिठाई देणे हे मनातील पूर्वीचा कडवटपणा टाकून देऊन भविष्यासाठी मैत्रीचे नुतनीकरण करणे याचे प्रतिक आहे. 

कोणताही उत्सव साजरा करणे हे सेवेशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याला देवाकडून जे काही मिळाले आहे ते आपण इतरांबरोबर वाटून घ्यायला हवे कारण दिल्यानेच आपल्याला मिळते.हा खरा उत्सव आहे. साजरा करणे याचा असाही अर्थ आहे की सर्व मतभेद दूर करून आत्म्याचे तेज वाढवणे. समाजातील प्रत्येकाने विवेकपूर्ण व्हायला हवे. आनंद आणि विवेक पसरवायला हवा आणि हे तेव्हाच होईल जेव्हा सर्वजण एकत्र येऊन ज्ञानात राहून उत्सव साजरा करतील.

दिवाळीचे महत्व | Importance of diwali

दिवाळी हा सण मागील वर्षभरात झालेल्या कुरबुरी आणि नकारात्मकता विसरण्याचा सण आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या विवेकावर प्रकाश टाकण्याची आणि पुन्हा नव्याने सुरवात करण्याचे स्वागत करण्याची ही वेळ आहे.

जेव्हा खऱ्या विवेकाचा उगम होतो तेव्हाच उत्सव सुरु होतो. बरेचदा उत्सव साजरा करताना तुम्ही तुमची एकाग्रता आणि सजगता घालवून बसता. उत्सवात ही सजगता टिकवून ठेवण्यासाठीच प्राचीन ऋषींनी प्रत्येक सणांत पूजा आणि पावित्र्याचा समावेश केला आहे. यांच कारणासाठी दिवाळीतही पूजेचा भाग असतो. दिवाळीतील आध्यात्मीक विचारांनी या उत्सवाला एक सखोलता मिळते. कोणताही उत्सव हा आध्यात्मिक असायला हवा आणि अध्यात्माशिवाय सखोलता येत नाही. दीपावली म्हणजे दिव्यांच्या रांगा ज्या आपण आयुष्यात कमावलेल्या विवेकाच्या द्योतक आहेत. सत्य आणि प्रेम यांनी अज्ञानावर मिळवलेला हा जय आहे.

दिवाळी ची आख्यायिका | Story of diwali

सत्यभामेने नरकासुराचा केलेला वध हा या विजयाचे प्रतिक आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला गेला होता. नरकासुर (नरक) राजाला असा वर मिळाला होता की त्याचा मृत्यू फक्त स्त्रीच्या हातूनच येईल. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिच्या हातून त्याचा वध केला गेला.

केवळ सत्यभामाच नरकासुराचा वध कां करू शकली ? सत्य म्हणजे खरे आणि भामा म्हणजे प्रिय. असत्य किंवा प्रेमाचा अभाव यांना नरकावर विजय मिळवता येत नाही. हिंसक मार्गाने तो घालवता येत नाही. केवळ प्रेम आणि समर्पण यानेच नरकापासून सुटका होऊ शकते. अहिंसा प्रेम आणि समर्पण या स्त्रीचे उपजत गुण आहेत. त्यामुळे फक्त सत्यभामाच नरक नष्ट करून पुन्हा एकदा प्रकाश आणू शकली. आणि नरकासुराची शेवटची इच्छा अशी होती की त्याचे जाणे म्हणजेच अंध:कार नाहीसा होण्याचे प्रतिक म्हणून प्रत्येक घरात दिवे लावून साजरे केले जावे.

अशाप्रकारे प्रेम आणि विवेकाच्या प्रकाशाचा उगम साजरा करणारा हा उत्सव आहे. तसेच यांच दिवशी दैत्यांचा राजा रावण याच्यावर विजय मिळवून राजा श्रीराम अयोध्येत, स्वत:च्या राज्यांत परत आले. अयोध्या म्हणजे जे नष्ट करू शकत नाही ते. राम म्हणजे आत्मा. जेव्हा जीवनात आत्म्याचे राज्य असते तेव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो. जीवन सर्वत्र आहे. पण जेव्हा जीवनात आत्मा जागवला जातो तेव्हा दिवाळी साजरी होते.

विवेकाचा दीप आणि चेहऱ्यावर स्मित

दिवाळीबद्दल अनेक  दंतकथा असल्या तरी प्रत्येक हृदयात विवेकाचा दीप चेतविण्यासाठी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते. जीवनाचे अनेक पैलू आणि अनेक स्तर आहेत. त्या सर्वांवर प्रकाश टाकणे हे आपले महत्वाचे काम आहे. कारण त्यातला एक जरी पैलू अंधारात असला तरी जीवन पूर्णपणे खुलणार होणार नाही. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक पैलूवर तुम्ही ज्ञानाचा प्रकाश टाकण्याची गरज आहे हे तुमच्या ध्यानात आणून देण्यासाठीच दिव्यांच्या माळा लावल्या जातात. विवेकाची गरज सगळीकडेच आहे. कुटुंबातील एक व्यक्ती जरी अंधारात असेल तरी तुम्ही आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाच्या मनात विवेकाचा दीप चेतावायला हवा. आणि तेच पुढे जाऊन संपूर्ण समाजात आणि पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत करायला हवे.

जो ज्ञानात नाही त्याच्यासाठी दिवाळी वर्षातून एकदाच येते पण जो विवेकी असतो त्याच्यासाठी दररोज प्रत्येक क्षणच दिवाळी असते. ही दिवाळी ज्ञानात राहून आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करून साजरी करा. तुमच्या हृदयात प्रेमाचा, घरात समृद्धतेचा दीप चेतवा, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी करुणेचा, अज्ञानरूपी अंध:कार घालवण्यासाठी ज्ञानाचा आणि देवाने आपल्यावर जो समृद्धतेचा वर्षाव केला आहे त्यासाठी कृतज्ञतेचा दीप चेतवा.  

 

श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य  @SriSri

आपला अभिप्राय देण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क  : webteam.india@artofliving.org